समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित,समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकुलातील उपस्थित महिलांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
प्रा.स्नेहा साळवे म्हणाल्या की,व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे महत्व.बाह्य सौंदर्य बरोबरच आंतरिक सौंदर्य देखील वाढवलं पाहिजे.स्त्री परिपूर्ण तेव्हाच होते जेव्हा बाह्य सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्य वाढते.आपल्या मनातील न्यूनगंड दूर करून व्यक्त होता आलं पाहिजे.त्यातून प्रसन्नता वाढते.नवनवीन विचारांना चालना मिळते.स्वतःची प्रेरणाव कर्तृत्व यातून स्वतःला सिद्ध करावं लागतं.स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करून केलेली लढाई ही अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम करते.स्वतःचे सुप्त कलागुण प्रदर्शित करण्यासाठी स्वतः मेहनत घ्यावी लागते.म्हणून सर्वांनी प्रयत्नवादी राहावे.
महिला तक्रार निवारण समिती सदस्या प्रा.रोहिणी रोटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे.महिला सबलीकरण व सक्षमिकरण घडून आणण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला ओळखून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आजची स्त्री हि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभावीपणे व उत्कृष्टरित्या आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.जगात कोणतेही क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये महिला अग्रभागी नाहीत.परंपरागत पद्धतीने चूल आणि मूल इथपर्यंतच न थांबता सामाजिक,राजकीय,क्रीडा,कला तसेच सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी नैपुण्य मिळवावे असे त्या म्हणाल्या.महिला सबलीकरण व सक्षमीकरण,निर्भय कन्या अभियान,विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास,जागर स्त्री शक्तीचा,नेतृत्व गुण विकास कार्यशाळा,सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम,महिला कराटे प्रशिक्षण कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन संकुला मध्ये नेहमी केले जाते.यातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संकुलातील शिक्षिकांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अश्विनी खटिंग यांनी केले तर आभार प्रा.संपदा निमसे यांनी मानले.